कुक्कुटपालन व्यवसायाविषयी मिळवा परिपूर्ण मार्गदर्शन
पावसाची अनियमितता तसेच इतरही अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगांवर विसंबून राहावे लागते. दुग्धोत्पादन, शेळीपालन यांसारख्या पूरक व्यवसायांबरोबरच कुक्कुटपालन हा व्यवसायही शेतकऱ्यांसाठी तसेच इतर व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरत आहे. मात्र, आधुनिक पद्धतीने कुक्कुटपालन केल्यास त्यातून कमी श्रमात आणि खर्चात अधिक लाभ मिळवता येतो. त्यासाठी शास्त्रशुद्ध कुक्कुटपालन व्यवसायाचे तंत्र माहिती करून घेण्याची गरज आहे. हे जाणून कुक्कुटपालन तंत्राचे अभ्यासक डॉ. वसंत हिंगणे लिखित ‘कुक्कुटपालन व्यवसाय मार्गदर्शक’ हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे.
गेली अनेक वर्षे कुक्कुटपालन क्षेत्रात नवनवीन व्यावसायिक संस्था व व्यावसायिकही उतरल्यामुळे या क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. अशावेळी व्यवसायात नव्याने उतरू पाहणाऱ्या व्यावसायिकांनी नेमका कोणत्या गोष्टींचा विचार करावा, तसेच आधीपासून या व्यवसायात असलेल्या कुक्कुटपालन व्यावसायिकांनी आपला व्यवसाय कसा वाढवावा व अधिक नफा मिळवण्यासाठी नेमके काय करावे, याबाबत या पुस्तकात तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले आहे.
ब्रीडर पक्ष्यांबद्दलची दुर्मीळ माहिती, अंड्यांची उबवणूक, आरोग्य व्यवस्थापन, विविध रोग व त्यांचा प्रतिबंध, पक्ष्यांसाठी खाद्य अशा अत्यावश्यक विषयांचा संपूर्ण तपशील या पुस्तकात आहे. त्याचप्रमाणे कुक्कुटपालनातील धोके, नवनवीन रोग, पक्ष्यांकडून माणसांना होणारे रोग, बाजारपेठेतील स्पर्धा, जागतिकीकरणाचा परिणाम याबद्दल माहिती देत असतानाच डॉ. हिंगणे यांनी प्रकल्प अहवाल व अनुवंशशास्त्र या किचकट विषयांबाबतही सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.





Reviews
There are no reviews yet.